गोल्डन मोटर्स प्रकरण! फसवणूकित आ. महेश बालदींच्या समर्थकाचा हात

पनवेल, नवी मुंबईत गाजत असलेल्या गोल्डन मोटर्सच्या हेराफेरीचे धागेदोरे उरणच्या सोनारीपर्यंत
। उरण । प्रतिनिधी ।
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हददीत मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या गोल्डन मोटर्स फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे थेट उरणच्या सोनारी गावापर्यंत येऊन पोहोचले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात उरणमधील भाजप आ. महेश बालदी यांचा कट्टर समर्थक तथा सोनारीच्या भाजपच्या सरपंच पुनम कडू यांचे पती तथा भाजपा युवा कार्यकर्ता महेश नरेश कडू देखील ग्राहकांच्या फसवणुकीत सहभागी असल्याची लेखी तक्रारच धुतूम गावातील तक्रारदाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे. या ग्राहकाने साडेदहा लाख रुपये भरूनही त्याला आजपर्यंत गाडीच मिळाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गोल्डन शोरूमच्या या फसवणुकीचे जाळे खूप मोठे असून त्यांनी 367 ग्राहकांची सुमारे 30 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याची गंभीर बाब या निमित्ताने चर्चिली जात आहे.

सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक फसवणूक करणार्‍या गोल्डन शोरूम्सच्या विक्रम तिलोरे, संतोष वेंगुर्लेकर आणि त्यांना ग्राहक पाठवून आर्थिक फसवणुकीत सहभागी असलेल्या उरणच्या सोनारी गावातील भाजपा कार्यकर्ता महेश नरेश कडू यांच्यावर काय कारवाई करतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. आ. महेश बालदी याचा कट्टर समर्थक आणि भाजपचा उरणच्या जासई मतदार संघातला उद्याचा चेहरा म्हणून उदयास आलेले महेश नरेश कडू यांच्या सहभागाने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यांचा नवी मुंबईत गाजत असलेल्या गोल्डन शोरुम्स आर्थिक फसवणूक प्रकरणात असल्याचा दाखला देणारी तक्रारच धुतूम गावातील फसवणूक झालेला ग्राहक प्रतिक प्रल्हाद ठाकूर याने पनवेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावाने केली आहे.

दिलेल्या तक्रारीनूसार प्रतिक ठाकूर याने म्हटले कि, आपण गाडी खरेदी करणार होतो. त्यानिमित्ताने बाजारभावापेक्षा कमी भावाने चारचाकी गाड्या मिळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोनारी गावातील महेश नरेश कडू यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सीवूडमधील गोल्डन शोरुम्समध्ये जा आणि आपले नाव सांगून गाडी घ्या. तुम्हाला कमी किंमतीत गाडी मिळेल, असे सांगितले होते.
त्या अनुषंगाने प्रतिकने गोल्डन शोरूम्सला आत्तापर्यंत साडेदहा लाख रुपये अदा केले आहेत. मात्र ना गाडी आणि ना गाडीसाठी भरलेले पैसे अशी स्थिती झालेल्या प्रतिकने पनवेल पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार केली आहे.

विक्रम तिलोरे, संतोष वेंगुर्लेकर आणि त्यांना ग्राहक पाठवून आर्थिक फसवणुकीत सहभागी असलेल्या उरणच्या महेश कडू यांच्यावर फसवणूक व विश्‍वासघातासह गाडी चोरल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. महेश कडू यांचे थेट आमदारांसोबत संबंध असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त या सर्व प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पनवेलच्या पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत या फसवणूक प्रकरणात फसल्या गेलेल्या सुमारे 26 ग्राहकांनी तक्रारी केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version