रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुवर्णसंधी

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील सर्व शाळांचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, तालुका माणगाव प्रवेश परीक्षेस विद्यार्थी नोंदणी मार्गदर्शन सभा गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याप्रसंगी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी मार्गदर्शन केले व विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते. नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णत निःशुल्कसह शिक्षणाची सुविधा आहे. नवोदय विद्यालयाचा पाठ्यक्रम केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारे संचालित करण्यात येतो.सुसज्ज कॉम्प्युटर व विज्ञान प्रयोगशाळा, सॅमसंग स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त ग्रंथालय, क्रीडांगण व जिम तसेच विद्यालयात मुला-मुलींसाठी आधुनिक व उत्तम शिक्षणाची तसेच निवासाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी व 25 टक्के जागा शहरी विभागातील सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय शाळातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रा. जवाहर नवोदय विद्यालय रायगड यांनी केले आहे.

Exit mobile version