। स्पेन । वृत्तसंस्था ।
भारताची सुपरस्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी फॉर्ममध्ये परतली आहे. विनेशने स्पेन ग्रांप्रीमध्ये देशाचा झेंडा फडकवला आहे. तिने या स्पर्धेत महिलांच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकून आपल्या ऑलिम्पिकचे स्वप्न खरे करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकलेले आहे. स्पेन ग्रांप्रीच्या अंतिम फेरीमध्ये विनेशने मारिया ट्युमरकोव्हाचा 10-5 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. पूर्वी रशियाकडून खेळणारी मारिया आता तटस्थ खेळाडू म्हणून खेळते आहे.
तत्पूर्वी बुधवारी शेवटच्या क्षणी शेंजेन व्हिसा मिळालेल्या विनेश फोगटने तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. विनेशने प्रथम क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा 12-4 असा पराभव केला. यानंतर तिने कॅनडाच्या मॅडिसन पार्क्सचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत कॅनडाच्या केटी डचॅकचा 9-4 असा पराभव केला. यानंतर विनेश 20 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्सला जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन 26 जुलैपासून होणार आहे. या खेळांच्या महाकुंभात विनेश पदकाची प्रमुख दावेदार म्हणून उतरणार आहे.