भारतीय तिरंदाजांचा सुवर्णवेध

अमन सैनी, प्रगती यांची सुवर्णपदकांवर मोहोर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अमन सैनी व प्रगती या भारताच्या तिरंदाजांनी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये अचूक बाण सोडत सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. भारताचे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील हे चौथे सुवर्णपदक ठरले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण दहा पदके पटकावली असून, पदकतालिकेत चौथ्या स्थानावर विराजमान आहेत.

अमन व प्रगती या जोडीने कंपाऊंड मिश्र प्रकारात कोरियाच्या सू चाओ-सिऊंगयुन पार्क या जोडीवर 157-156 असा विजय साकारत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. चीन तैपईच्या मिंग चिंग लीन-झेड वेई वू या जोडीने कांस्यपदक पटकावले. भारताने तिरंदाजीतील कंपाऊंड प्रकारात आणखी दोन पदके पटकावली. पुरुष व महिला सांघिक गटात ही पदके मिळाली. संगमप्रीत बिस्ला, अमन सैनी व रिषभ यादव या भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कंपाऊंड सांघिक प्रकारात कोरियाच्या तिरंदाजांना पराभूत करीत कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय खेळाडूंनी कोरियाच्या मिनचँग वोन, हॅकजीन सिम व सिऊंगयुन पार्क या तिरंदाजांना 229-225 असे पराभूत केले.

भारताच्या महिला तिरंदाजांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी घालवली. कोरियाच्या सोईन सिम, सिऊंगिओन हॅन व सूए चाओ या खेळाडूंनी भारताच्या महिला तिरंदाजांवर 229-224 असा विजय मिळवत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. भारताच्या महिला संघात पूर्वशा, प्रगती व अवनीत या खेळाडूंचा समावेश होता.

नेमबाजीत दोन पदके
भारताला तिरंदाजीसह नेमबाजीतही पदकांची कमाई करता आली. भारतीय संघाने नेमबाजीत दोन पदके पटकावली. विजयवीर, उदयवीर सिद्धू व आदर्श सिंग या भारतीय खेळाडूंनी 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांनी 1729 गुणांची कमाई केली. सूर्यप्रताप, सरताज सिंग व ऐश्वर्य तोमर यांनी 50 मीटर रायफल सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले.

Exit mobile version