। कोबे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करगणी येथील 34 वर्षीय सचिन खिल्लारीने येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत एफ 46 गटातील गोळाफेकीत नवीन आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना गेल्यावर्षी जिंकलेले सुवर्णपदक कायम ठेवले. त्याच्या कामगिरीमुळे भारताने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीही पार केली.
भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच सुवर्णपदकांसह 11 पदके जिंकली असून गेल्यावर्षी पॅरिस येथे झालेल्या स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य व तीन ब्राँझपदके अशी 10 पदके जिंकली होती. सचिनने पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकताना 16.21 मीटरचा आशियाई विक्रम केला होता. हा विक्रम इतिहास जमा करताना त्याने येथे 16.30 मीटर अंतरावर गोळा भिरकावला. मंगळवारी भारतीय खेळाडूंनी पाच पदकांची कमाई केली होती. सध्या चीन पदकतालिकेत आघाडीवर तर ब्राझील दुसर्या स्थानावर आहे. स्पर्धेचे आणखी तीन दिवस शिल्लक असून भारतीय खेळाडूंना आणखी पदके जिंकण्याची संधी आहे.
सुवर्णपदक जिंकण्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आनंदी आहे. या कामगिरीमुळे मी पॅरिस पॅरा ऑलिंपिकसाठी पात्र झालो असून तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास आहे.
सचिन खिल्लारी,
सुवर्णपदक विजेता.