विवाह इच्छुकांसाठी सुवर्णयोग

| रायगड | प्रतिनिधी |

तुळशी विवाह झाल्यानंतर विवाहेच्छुक वधू-वरांच्या लगीनगाईला सुरुवात होते. नोव्हेंबर ते जून या कालावधीत विवाहाचे मुहूर्त आहेत. 1 नोव्हेंबरपासून 30 जून 2024 तारखेपर्यंत 74 मुहूर्त आहेत. तसेच काढीव मुहूर्त गृहीत धरल्यानंतर हाच आकडा शंभरवर जाणार आहे. त्यामुळ जास्तीचे मुहूर्त असल्याने विवाह इच्छुकांसाठी सुवर्णयोग आला आहे. गतवर्षीच्या विवाह मुहूर्तांपेक्षा यंदा 2024 च्या जानेवारी तसेच फेब्रुवारीत अधिक मुहूर्त आहेत. या दोन महिन्यात तब्बल 28 दिवस लग्नमुहूर्त आहेत; तर मे आणि जूनमध्ये प्रत्येकी दोन मुहूर्त आहेत. अशातच सध्या आपल्याकडे वाढीव मुहूर्तावर वर्षभर लग्न होतात.

दिवाळी संपल्यानंतर तुळशी विवाहा सुरुवात होणार आहे. त्यानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे आत्तापासून मंगल कार्यालय, कॅटरर्स, डेकोरेशन बुकिंगसाठी वधू-वरांच्या नातेवाईकांची लगबग सुरू झाली आहे. सद्यस्थितीत लग्नमुहूर्त जास्त असले, तरी मुहूर्त ठरवताना गुरू बल आदी बाबींचा विचार करूनच तारखा दिल्या जातात. तसेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत लग्न तारखा जास्त असल्याने वधू-वरांकडील मंडळी सोईस्कर तारखा बघत असून तुळशीचे लग्न लागल्याशिवाय शक्यतो तारखा निवडल्या जात नाहीत. याखेरीज काही विवाहेच्छुकांचा वाढीव लग्न मुहूर्तावरही भर असतो. त्यामुळे विवाह सोहळे चांगलेच रंगणार आहेत.

शेतकरी, व्यावसायिकांसमोर अडचणी
लग्नसमारंभ म्हटले की, वर पक्षाचे भाव वाढलेले असायचे; परंतु पूर्वापार चालत आलेली परिस्थिती आता बदलत आहे. मुलीपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता पालकांना सतावत आहे. नोकरदार, चांगला पगार, स्वतःचे घर, शेती, लहान कुटुंब असणाऱ्या मुलांना अधिक पसंती आहे; तर शेतकरी आणि व्यावसायिक मुलांना आयुष्याचा साथीदार शोधताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सामाजिक अभ्यासक राजेंद्र वाघ यांनी सांगितले.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर (2023) 1, 6, 16, 18, 20, 22, 25, 27, 28, 29
डिसेंबर (2023) 6, 7, 8, 14, 15, 17, 20, 21, 22, 25, 26.31
जानेवारी (2024) 2, 3, 4, 5, 6, 8, 13, 17, 18, 22, 27, 28, 30, 31
फेब्रुवारी (2024) 1, 2, 4, 6, 12, 13, 14, 17, 18, 24, 26, 27, 28, 29
मार्च (2024) 3, 4, 6, 7, 11, 16, 17, 26, 27, 30
एप्रिल (2024) 1, 3, 4, 5, 18, 20, 21, 22, 26, 28
मे (2024) 1, 2
जून (2024) 29 आणि 30 असे विवाह मुहूर्त आहेत.

सध्या डेस्टिनेशन वेडिंगचे फॅड मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लॉन, समुद्र किनारे या ठिकाणी लग्न करण्याचा नागरिकांचा कल वाढला आहे. त्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून लग्नासाठी रिसॉर्ट बुकिंग होत आहे. यंदा जास्त मुहूर्त असल्याने व्यवसायवृद्धी होणार आहे.

निलेश उतेकर, रिसॉर्ट मालक, चोंढी

यंदा तब्बल 74 विवाह मुहूर्त आहेत. यामध्ये काढीव मुहूर्ताचीसुद्धा भर पडणार आहे. त्यामुळे यंदा लगीनघाई जोरदार आहे. हंगामाला सुरुवात होण्याआधीच कार्यालयांचे बुकिंग सुरू झाले आहे.

नितेश झावरे, व्यवस्थापक, मंगल कार्यालय

हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह जुळवताना गुण आणि कुंडली पाहून विवाहाचा निर्णय घेतला जातो. मुहूर्त काढताना गुरू, शुक्र या ग्रहांचा विचार केला जातो. काही विवाहेच्छुक मंगल कार्यालयाची उपलब्धता आणि सुट्टीचा दिवस पाहत वाढीव मुहूर्तावर अधिक भर देतात.

गणेश दाते, ज्योतिषाचार्य
Exit mobile version