उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
| मुंबई | प्रतिनिधी |
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असताना राज्य सरकारने त्यासाठी 30 जूनची तारीख दिली आहे. 30 जून हा नेमका कोणता मुहूर्त आहे? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पंचांगातून हा मुहूर्त काढला, असा रोकडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे 5 नोव्हेंबरपासून पुन्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ’मातोश्री’ निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच, अतिवृष्टीनंतर आता केंद्राचे पाहणी पथक येणार आहे. त्यांचा हा दौरा दोन-तीन दिवसांचा आहे. एवढ्या कमी वेळेत मराठवाड्यासह महाराष्ट्राचा दौरा ते कसा करणार, ते कुठे जाणार आणि ते कधी प्रस्ताव पाठवणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, तातडीने कर्जमुक्ती कशी होऊ शकते, हे आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखवून दिले आहे. यंत्रणा तीच आहे. आकडेवारी आहे. त्या आधारे आताचे सरकार कर्जमुक्ती का देत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी 30 जूनचा वायदा दिला असेल, तर आता डोक्यावर असलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? रब्बीच्या हंगामासाठी कर्ज कसे मिळणार आणि ते मिळाले तर त्याचे हप्ते भरायचे का, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणतात, मग जूनमध्ये केली तर बँकांचा फायदा कसा होणार नाही, हे कोणते गणित आहे. याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.







