| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील गोवेकरवाडी रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या खाणीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेले पाच जण बुडल्याची दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली. यात एका सोळा वर्षीय युवतीचा बुडून मृत्यू झाला तर चार जणांना वाचविण्यात यश आले.
कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्याकडे दिवाळीत मुंबईवरून अंजली प्रकाश गुरव (30), गौरी प्रकाश गुरव (18), गौरव प्रकाश गुरव (21), करिश्मा सुनील पाटील (16), दुर्वेश रवींद्र पाटील (9) हे आले होते. हे सर्वजण सोमवारी (दि.3) सायं. 4 वा. दरम्यान गोवेकरवाडी लगतच्या चिरेखाणीत आंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य मुलांना वाचविले. मात्र, यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली. यात गंभीर बनलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अन्य तीन मुले सुखरूप आहेत.







