विविध प्रकारच्या तक्रारींमुळे परवाना रद्द
| पनवेल ग्रामीम | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील दोन रेशन धान्य दुकानांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी आल्यामुळे दुकान नंबर 9 आणि 17चा परवाना रद्द करण्यात आला आहे, असे पुरवठा अधिकारी पनवेल यांनी सांगितले.
रेशन दुकाने दररोज 8 तास उघडी असणे गरजेचे आहे. मात्र, तालुक्यातील काही दुकाने महिन्यातून दोन ते तीन दिवसच बहुतांशी उघडे असतात. त्यामुळे महिन्याभरात कधीही धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना परत जावे लागते. त्यांना आठवड्यातून फक्त एक दिवस रेशनिंग दुकान बंद ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, मोजकेच दिवस दुकाने उघडी असतात. रेशन धान्य लाभार्थ्यांना धान्य बाबत काही तक्रारी असल्यास ते दुकानातील तक्रार वहीत तक्रार लिहू शकतात. मात्र, दुकानात तक्रार वहीच नसल्याने काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. तसेच, रेशन दुकानात लोकांना स्पष्टपणे वाचता येईल, असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुट्टीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन, भाव व देय प्रमाण, उपलब्ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते. असे बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. अशाच तक्रारी सातत्याने पनवले तालुक्यातील दोन रेशनिंग दुकानांबद्दल येत होत्या.
पनवेल तालुक्यासह शहरात एकूण 199 रेशनिंगची दुकाने आहेत. नवीन पनवेल येथील दुकान नंबर 9 आणि 17 बाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत पुरवठा विभागाने दुकानांची पाहणी केली असता त्या ठिकाणी भाव फलक, साठा फलक नसल्याचे दिसून आले. तसेच, संगणकीकृत यादी नाही, धान्य नमुने नाही, भेट पुस्तिका नाही, वेळ फलक नाही, शेरे बुक आणि तक्रार बुक नसल्याचे देखील निदर्शनास आले. त्याचबरोबर दुकानात धान्य देखील कमी आढळून आले आणि लाभार्थ्यांना पावती देखील दिली जात नसल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकान नंबर 9 आणि 17 चा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. यावेळी दुकानाची 100 टक्के अनामत रक्कम शासन जमा करावी, तसेच लाभार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नजीकच्या दुकानाला हे रेशनिंग दुकान जोडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, काही वर्षांपासून प्राधिकार कोप्रोली येथे प्राधिकार पत्र नसतानाही रेशनिंग दुकान सुरू होते. स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर हे रेशनिंग दुकान बंद करण्यात आले आणि बचत गटाला देण्यात आले. प्राधिकार पत्र नसताना दुकान चालवणे हा गुन्हा आहे. तसे असताना देखील या दुकानदारावर अद्याप देखील गुन्हा दाखल झालेला नाही. त्याच्या मागे कोणाचा वरदहस्त आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
काही दुकानात रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेतले जातात. महिनाभर धान्याचे वितरण करण्याचा शासन नियम असताना त्याला तीलांजली दिली जात आहे. दोन ते चार दिवस धान्याचे वितरण करून दुकानाला लॉक लावले जाते. त्यानंतर ग्राहकांना धान्य दिले जात नाही. त्यामुळे काही वेळेला दुकान मालक आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग ओढवतात. पुरवठा अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
रेशनिंग धारक,
पनवेल







