देशातील महिला राजदुतांना अच्छे दिन

विविध राष्ट्रांमध्ये कौतुकास्पद कामगिरी
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय परराष्ट्र सेवेत महिला राजदूतांना चांगले दिवस आले आहेत. पारंपारिक दृष्ट्या परराष्ट्र सेवा ही पुरुषप्रधान सेवा आहे. परंतु, जेव्हा एखादी स्त्री परराष्ट्र सचिव पदापर्यंत पोहोचते, तेव्हा शी हॅज ब्रोकन द सिलिंग असं वर्णन केले जाते. गेल्या काही वर्षात चोकिला अय्यर, निरूपमा राव व सुजाता सिंग या तीन महिला भारताच्या परराष्ट्र सचिव झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत कै सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रीपदाचा पदाचा कारभार अत्यंत कार्यक्षमतेने चालविला. मोदी हे पंतप्रधान म्हणून परराष्ट्राची सूत्रे हलवित होते, तरी महिला परराष्ट्र मंत्री म्हणून त्या देशविदेशात लोकप्रिय झाल्या.
महिला राजदूतांना चांगले दिवस आले आहेत, हे अलीकडे पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया उर्फ माजी राजदूत व परदेशस्थ भारतीयांच्या खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीमुळे दिसते. त्यांनी विद्यमान महिला राजदूतांची त्यांच्या छायाचित्रांसह माहिती देऊन शिष्टाई वा मुत्सद्देगिरी क्षेत्राची एक प्रकारे सेवा केली असून, त्या विषयाचे अध्ययन करणार्‍यांच्या ज्ञानात आणखी भर घातली आहे. त्याबाबत त्यांचे आभार मानायला हवे.
या महिला राजदूतांमध्ये त्यांनी सोळा महिलांचा समावेश केला आहे. अंगोलामध्ये श्रीमती प्रतिभा परकार राजनम, श्रीमती रूचिरा कंभोज (भूतान), श्रीमती देवयानी खोब्रागडे (कंबोडिया), श्रीमती मधुमिता हजारिका भगत (सायप्रस), श्रीमती पूजा कपूर (डेनमार्क), डॉ मीना मलहोत्रा (इटली), श्रीमती शुभदर्शिनी त्रिपाठी ( कझाखस्तान), श्रीमती सुप्रिया रंगनाथन (दक्षिण कोरिया), श्रीमती संगीता बहादूर (माल्टा), श्रीमती कोथ्थापल्ली नंदिनी सिंगला (मॉरिशस), श्रीमती नगमा मलिक (पोलंड), श्रीमती नम्रता सतदेवे कुमार (स्लोव्हेनिया), श्रीमती रुचिरा दुराय (थायलँड), श्रीमती गायत्री इसार कुमार (ब्रिटन), श्रीमती राधा व्यंकटरमन (इस्वातिनी) व नियोजित राजदूत रीनत संधू ( द नेदरलँड्स) त्या होत. या व्यतिरिक्त निरनिराळ्या देशात राजदूतपदी असलेल्या स्वित्झरलँडमधील मोनिका कपिल मोहता यांचाही समावेश करावा लागेल.

Exit mobile version