देशातील बळिराजासाठी खुशखबर

हवामान विभागाकडून पावसाचा पहिला अंदाज जाहीर

। मुंबई । प्रतिनिधी ।

यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने सोमवारी (दि. 15) जाहीर केले. जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी 106 टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यामुळे पहिल्या अंदाजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दुष्काळ, तापमानवाढ, गारपीट, पूर असे अनेक हवामान बदल घडत असताना देशात यंदा पाऊस कसा असणार याविषयी शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा होती. सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने महाराष्ट्रात आशादायी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळच्या दक्षिणेकडील टोकावर मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस माघार घेतो. यावर्षी 87 सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या एकूण 106 टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या भूमध्यरेखीय प्रशांत महासागरीय क्षेत्रात अल निनो मध्यम स्थितीवर सक्रीय असून, जलवायू मॉडलच्या पूर्वानुमानानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला अल निनोची स्थिती तटस्थ होण्याचा अंदाज आहे. सरासरीहून अधिक पावसाची शक्यता यंदा देशात वायव्य, पूर्व, इशान्य भाग वगळता उर्वरित भागांमध्ये सामान्य पावसाच्या तूलनेत अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या देशात कोणत्या भागात मान्सूनचे ढग सक्रीय असतील याविषयी स्पष्टता मिळाली नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

पाऊस मोजण्याची श्रेणी
यंदाच्या हंगामात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकित करण्यात आले आहे.
मान्सून वेळेवर दाखल होणार
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यापर्यंत अल निनोचं ला निनामध्ये रूपांतर होईल. यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला. मात्र, यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Exit mobile version