मासळी खवय्यांसाठी खूशखबर! सुरू होतोय मासेमारीचा नवा हंगाम

मच्छिमार बांधवांची लगबग सुरू

| चिरनेर | प्रतिनिधी |

शासनाकडून 1 जून ते 31 जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी कालावधी 1 ऑगस्टला संपणार आहे. या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. यानिमित्ताने उरण तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे व केळवणे, पेण मधिल सोनखार, उर्णोली, दादर, रावे तसेच ग्रामीण भागातील अन्य बंदरात तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मच्छिमार बांधव दर्याला निघाला असून बंदरावर मासेमारीला जाण्याच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.

दोन महिन्यांच्या बंदी नंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे. यासाठी दोन महिन्यांपासून उभ्या करण्यात आलेल्या बोटींची रंगरंगोटी, त्यावरील उपकरण व इंजीनची डागडुजी, छिद्र पडलेल्या जाळीची दुरुस्ती, तसेच बोटी समुद्रात नेऊन त्यांची तपासणीसह विविध कामे सुरू आहेत. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून पावसाळ्यात दरवर्षी 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीकरीता खोल समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात येते. हा मासळीच्या प्रजननाचा काळ असल्याचे बंदी मागचे कारण शासनाकडून दिले जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीला जाणाऱ्या मच्छिमारांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, देशातील इतर राज्यात पावसाळ्यात मासेमारी सुरू असल्याने इतर राज्यातील मासेमारी बोटी या काळात राज्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करीत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बंदी काळाचा विचार करण्याची मागणी पुढे येत आहे. या कालावधीत करंजा बंदरात मासेमारी करणाऱ्या अनेक बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली होती.

मासेमारी बंदी असल्याने दररोज मिळणाऱ्या ताज्या व मोठ्या मासळीची आवक कमी होते. त्यामुळे खवय्यांना शीतगृहात साठवून ठेवण्यात आलेल्या मासळीवर विसंबून रहावे लागते. एकीकडे सरकार मासेमारीवर बंदी घालते. मात्र, या काळात मच्छिमार व या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना कोणत्याही प्रकारची मदत करीत नाही. तर, दुसरीकडे सरकारने मच्छिमारांच्या डिझेलवरील लाखो रुपयांचे परतावे (अनुदान) थकीत असल्याची माहिती करंजा येथील मच्छिमारांनी दिली आहे. तर, हा हंगाम तरी कोणतेही वादळी विघ्ने न येता सुरू व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

चिरनेर

Exit mobile version