कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेकडून चार अनारक्षित फेऱ्या

| मुंबई | प्रतिनिधी |

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने मुंबईतून आणखी चार अनारक्षित फेऱ्या जाहीर केल्या आहेत. गाडी क्रमांक 01009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 12 आणि 13 सप्टेंबरला दुपारी 1.45 वाजता सुटेल, तर परतीची गाडी क्रमांक 01010 सावंतवाडी रोडहून 13 आणि 14 सप्टेंबरला पहाटे 4.05 वाजता सुटणार आहे. अनारक्षित गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारापसह 23 स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या गाड्यांना 12 शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस प्रणाली तसेच रेलवन ॲपद्वारे तिकीट काढता येणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी 14 ते 15 सप्टेंबरदरम्यान देशभरात 386 गणपती विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या 258, पश्चिम रेल्वेच्या 64, कोकण रेल्वेच्या 58 आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलीस यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

Exit mobile version