250 बसेस थांबवल्या, चालक-वाहकांना ना पाणी, ना स्वच्छतागृह
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणवासीयांचा मोठा सण असणाऱ्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) कंबर कसल्याचा दावा केला असला, तरी या नियोजनामागील भीषण वास्तव आता समोर आले आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगत सुमारे 250 एसटी बसेस थांबवण्यात आल्या आहेत. मात्र, या बसेसवर कर्तव्य बजावणाऱ्या 450 हून अधिक चालक आणि वाहकांसाठी अन्न, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची कसलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे हजारो प्रवाशांना सुखरूप कोकणात पोहोचवणाऱ्या लालपरीच्या सारथ्यांचे उघड्यावर अक्षरशः हाल होत आहेत.
रात्र अंधारात, जेवणाचीही भ्रांत
नवी मुंबई विमानतळ लगतच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या या बसेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध आगारांतून चालक-वाहक दाखल झाले आहेत. मात्र, या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रशासकीय अनास्थेचा तीव्र फटका त्यांना बसला आहे. परिसरात पिण्याच्या पाण्याचा एकही टँकर किंवा व्यवस्था नाही.परिसरामध्ये अंधाराचे साम्राज्य असून पुरेशा दिव्यांची सोय नाही. लघुशंका व शौचासाठी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध न केल्याने चालक-वाहकांना उघड्यावर जावे लागत आहे. तर जेवणाची सोय नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर उपाशीपोटी किंवा निकृष्ट अन्न खाऊन रात्र काढण्याची वेळ आली आहे.
नेत्यांची बॅनरवर चमकोगिरी, प्रत्यक्ष कामात शून्य
सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्र, पनवेल एसटी डेपो परिसर आणि महामार्गांवर स्थानिक आमदार, खासदार आणि आजी-माजी नगरसेवकांचे 'चाकरमान्यांचे स्वागत' करणारे मोठमोठे फ्लेक्स व बॅनर्स झळकत आहेत. मात्र, ज्या बसेसच्या भरवशावर चाकरमानी कोकणात जाणार आहेत, त्या बसेसच्या चालकांची आणि वाहकांची सुध घेण्यास एकाही लोकप्रतिनिधीला वेळ मिळालेला नाही. लोकप्रतिनिधी केवळ राजकीय श्रेयवादात आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीत मग्न असून प्रत्यक्ष जमिनीवर मदतकार्य शून्य असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.





