अंदमानमध्ये दाखल, 31 मेपर्यंत केरळात; महाराष्ट्रात 12 जूनपर्यंत डेरेदाखल होणार
| पुणे | प्रतिनिधी |
वाढत्या तापमानामुळे आणि उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये डेरेदाखल होईल असा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे तो अंदमान-निकोबारमध्ये पोहोचला आहे. अंदमानात स्थिरावल्यानंतर 31 मे रोजी तो केरळमध्ये प्रवेश करेल. महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील आठवड्यात वळीवाच्या सरी कोसळणार आहेत. तर, 10 ते 12 जूनदरम्यान मान्सून महाराष्ट्रात येणार आहे, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनने गेल्यावर्षी महाराष्ट्रात प्रतीक्षा करायला लावली होती. यंदा मात्र तो दोन दिवस आधीच महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून धो-धो बरणार असून, सुमारे 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. मान्सून दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र एक दिवस आधीच 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येत आहे.
मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. मात्र, यंदा 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकत आहे. गेल्या वर्षी मान्सून केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला दाखल झाला होता. तर महाराष्ट्रात तो 19 जूनला आला होता. यंदा मान्सून महाराष्ट्रात 10 ते 12 जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे.
‘ला निना’मुळे चांगला पाऊस गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. गेल्यावर्षी ‘अल निनो’मुळे सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे यंदा 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. आता आठवडाभर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसह तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. 27 मेपासून राज्यभरात पूर्वमोसमी म्हणजेच वळीवाच्या पावसाला सुरुवात होणार आहे.