। पनवेल । वार्ताहर ।
उत्पादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीणने विदेशी मद्यासह अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक केली. संतोष उरथ, बिजू उरथ आणि बिनु कल्लूर अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
उत्पादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीण यांनी 23 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश वजन काट्यासमोर पेंधर, तळोजा एमआयडीसी येथे सापळा रचला. यावेळी एका चार चाकी वाहनांमध्ये बनावट विदेशी मद्याच्या 17 बाटल्या आणि दोन मोबाईल असा एकूण पाच लाख 44 हजार 330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर पेंधर येथील एका पत्र्याच्या खोलीमध्ये जाऊन बनावट विदेशी मद्याच्या 54 बाटल्या, विदेशी मद्याच्या 42 बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट बुच, बनावट कागदी लेबल असा एकूण सहा लाख 41 हजार 295 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणी मिळून 11 लाख 85 हजार 595 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक अनिल बिराजदार, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, योगेंद्र लोळे, गैनीनाथ पालवे, निखिल पाटील, सचिन कदम यांनी केली.
विदेशी मद्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त
