| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील धरमतर येथे शुक्रवारी (दि.8) सायंकाळी खाडीत एक व्यक्ती बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. शहाबाज येथील गोरखनाथ नरेंद्र पाटील (45) असे मृत्यूत व्यक्तीचे नाव आहे.
नारळी पौर्णिमेच्या सणाला भाविक भक्तिभावाने धरमतर खाडी येथील समुद्रात नारळ अर्पण करत होते. ते नारळ पकडण्यासाठी गावातील तरुण धरमतर खाडीवर असणाऱ्या पूलावरून उडी टाकतात. पोलिसांचा तीव्र विरोध असताना सुद्धा ही तरुण मुलं जवळपास 40 फुटावरून उडी मारत नारळ पकडण्यात व्यस्त होती. या दरम्यान गोरखनाथ पाटील यांनी जी उडी टाकली ती त्यांच्या अखेरीस मृत्यूचे कारण ठरली. दरम्यान गोरखनाथ खोल समुद्रात बुडाल्याची शक्यता पोलिसांना आल्याने खोपोली येथून गुरुनाथ साठेलकर आणि ग्रामस्थ यांच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. या टीमने जवळपास दहा तास आपल्या टीमद्वारे शोध मोहीम चालू केली. मात्र, कुठेही शोध लागला नाही मग दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धरमतर जेटीच्या उत्तरेला खडकाळ भागात गोरखनाथ यांचा मृतदेह सापडला. पुढील तपास एपीआय देशमुख त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लांगी करीत आहेत.






