भाद्रपद महिन्यातील खारेपाटातील गौराई

– दिवदास म्हात्रे, पेण/वढाव

एकदा शंकराने पार्वतीला काली असे संबोधले त्यामुळे पार्वतीला राग आला. तिने देवाची उपासना केली. देवाला जागृत करुन तिने गौर वर्ण प्राप्त केला. शंकराने तिला गौरी हे नाव दिले. अधी हि गौरी म्हणजे उमा, पार्वती, जगदंबा अशी हि भूदेवता, जलदेवता, सृजनांची देवता आहे. गौरी हे पार्वतीचे दुसरं नाव, हिचे आगमन चार वेळा होते. प्रथम येणारी चैत्रातली चैत्रगौर, श्रावणातील मंगळागौर, भाद्रपदातील हरितालीका आणि चौथी गणेश आगमनानंतर येणारी ज्येष्ठ गौरी, गौरी ही शक्ती असून अध्यात्मिक दृष्टीने तिला शिवरुप आत्म्याची ब्रम्हकर कृती मानले जाते. माहेरवाशीन म्हणून आलेल्या गौरीचे आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता.

पेण खारेपाटात शाडूमातीची गौर असते. सोबत सुपात तेरडयाची रोपे, अग्निशिखा म्हणजेच नागवेल. नागवेलीची फुले तांबडया व पिवळया रंगाची असतात. सोबत जंगलातील भेंडयाचं पिवळया रंगाचं फुल असतं. गवरीचा मुल्हारी म्हणून नदीतील लव्हाळा असतो. अशा प्रकारे असते गवरीची साजरी गोजरी वनस्पती. तेरडयाची फुले तांबडी, गुलाबी, पांढरी अशा विविध रंगाची असल्यामुळे ती फार सुंदर दिसतात. पण खरी गवर हि तेरडयाचीच असते. असे पूर्वज सांगतात. तिलाच गवरीची पत्री म्हणतात. गवरीला कवळा या वनस्पतीची भाजी आवडते. या सर्व वनस्पती या औषधी असतात. गौरी सासरहून माहेराला दिड दिवस येते. पण ती आपल्या पतीदेवाची म्हणजेच शंकराची आज्ञा घेउनच येते. मात्र ती दिड दिवसाच्या पलीकडे राहू शकत नाही. म्हणून गोडधोडा बरोबर खारेपाटामध्ये मावसाहाराचा देखील बेत केला जातो. काही ठिकाणी चिंबोरी, मासे अथवा मटणाचा बेत असतो. आणि त्याचा नैवदय गौरीला दाखविला जातो. माहेरवाशीणी गवरीला नवसा म्हणून 2 ते 5 सुप वाहतात त्यात फळे, फुले, सुका मेवा असतो. गवरीची पहिल्या दिवशीची आरती पूजन झाल्यावर घेतली जाते.

गवर दुसऱ्या दिवशी विसर्जन करताना खारेपाटातील महिला गवरीच्या पाटाला हात न लावता गवर भजनासोबत नाचत नेतात. तर भालच्या सरोज अशोक म्हात्रे या शेतातील बांधावरून चिखलातून दोन्ही हात सोडून दिड तास गवर नाचवित नेतात. हे या खारेपाटातील गौराईचे वैशिष्टय आहे. तर गौराई वढावमधील शकुंतला म्हात्रे, अहिल्या म्हात्रे, वाशीच्या संगिता पाटील, फणसडोंगरी पेण येथील रंजना राम म्हात्रे, सापोलीतील हरिश्चंद्र म्हात्रे यांची गौर तसेच तांबडशेत, हमरापूर, कांदळे येथेही डोक्यावरील गौरी नाचवतात.

Exit mobile version