जिल्ह्यातील 315 अंगणवाड्या होणार अत्याधुनिक; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
| माणगाव | प्रतिनिधी |
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिक रूप देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली असून, या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकूण 315 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांचे रूपांतर आता आदर्श, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा ‘स्मार्ट अंगणवाड्यां’मध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील लहान मुलांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षणासोबतच आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लहानपणापासून रुजाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “स्मार्ट अंगणवाडी योजना ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक अंगणवाडीत अत्याधुनिक साहित्य, शिक्षणसाधने, आरोग्यविषयक उपकरणे आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.” या स्मार्ट किटमध्ये मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक सामग्री, डिजिटल शिक्षण साधने, आकर्षक फर्निचर, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय व्यवस्था, खेळणी, तसेच आरोग्य तपासणीसाठी मूलभूत साधनसामग्रीचा समावेश असेल. यामुळे मुलांसाठी आनंददायी आणि ज्ञानवर्धक वातावरण निर्माण होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून हजारो बालकांना आणि मातांना याचा थेट लाभ मिळणार आहे. योजनेमुळे ग्रामीण भागातील बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल. महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्यांचे सक्षमीकरण अधिक मजबूत होईल. महिला व बालविकास विभागाच्या या उपक्रमामुळे राज्यातील अंगणवाड्या ‘आधुनिक काळाच्या शिक्षण केंद्रा’कडे वाटचाल करत आहेत. पारंपरिक पद्धतीतून डिजिटल, आकर्षक आणि समावेशक शिक्षण प्रणालीकडे हा एक क्रांतिकारी टप्पा ठरत आहे. रायगड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात स्मार्ट अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर लहान मुलांच्या विकासास नवे बळ मिळेल, तसेच ‘प्रत्येक बालक सक्षम, निरोगी आणि शिक्षित समाजाचा पाया ठरेल’ अशी अपेक्षा आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.







