सरकारी कर्मचाऱ्यांचा कर्जत मधील संप यशस्वी

| नेरळ | वार्ताहर |

जुनी पेन्शन योजना आणि अन्य मागण्यांसाठी आजपासून कर्जत तालुक्यातील सरकारी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामध्ये कर्जत तालुक्यातील सर्व विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, उद्यापासून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक देखील सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी यांनी नागपूर येथे उपोषण सुरू केले आहे, तर आपल्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात कामबंद आंदोलन सुरू झाले आहे. कर्जत तालुक्यात तलाठी संघटना, महसूल कर्मचारी संघटना यांनी आज दि.14 पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यात कोकण विभाग तलाठी संघटना अध्यक्ष संतोष जांभळे, कोकण विभाग महसूल कर्मचारी संघटना सह सचिव संदीप गाढवे आणि महसूल कर्मचारी संघटना कर्जत तालुका अध्यक्ष रवी भारती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. कर्जत तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अन्य विभगातील कर्मचारी यांनी या कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. तर, जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा देणारे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक देखील उद्या दि.15 पासून सहभागी होणार आहेत. आज तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने केल्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देवून या कर्मचाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली.

दरम्यान, जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या अभ्यास समितीने तीन महिन्यात अहवाल देणे अपेक्षित असताना मुदतवाढ घेऊनदेखील अद्याप शासनाकडून समितीचा अहवाल जाहीर केला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे. या शासकीय कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनामुळे कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपरिषद मधील कर्मचारी कार्यालयात उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे अनेकांची शासकीय कामे खोळंबून राहिली आहेत.

Exit mobile version