रायगडात संपामुळे सरकारी कार्यालयांत शुकशुकाट
| अलिबाग | प्रतिनिधी |
एकच मिशन,जुनी पेन्शन अशा घोषणा देत रायगडातील सुमारे पंधरा हजार सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले. यामुळे नेहमी नागरिकांमुळे गजबजून जाणार्या सरकारी कार्यालयांमध्ये कमालीचा शुकशुकाट निर्माण झाला.संप मिटेपर्यंत हे वातावरण असेच राहणार आहे.याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.शिक्षकही संपात सहभागी झाल्याने शाळांवरही त्याचा परिणाम जाणवला.

पालीनगरी घोषणांनी दुमदुमली
सरकारी कर्मचारी संपाचा पाली तालुक्यातही चांगलाच परिणाम दिसून आला. सुधागडात 550 हुन अधिक सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.यामध्ये सरकारी कर्मचारी, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर देखील सहभागी झाल्याने येथील प्रशासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर,सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप नागे तसेच समन्वय समिती चे निमंत्रक प्रभाकर नाईक यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात बेमुदत संप आंदोलन करण्यात आले. सुधागडात या राज्यव्यापी संपाला कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तळा : दीडशे कर्मचारी सहभागी
जुन्या पेन्शन मागणी साठी शासकीय कर्मचार्यांच्या संघटनेने 14 मार्च रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात तळा तालुक्यातील जवळपास 150 कर्मचारी सहभागी झाले होते.बळीचा नाका परिसरात तळा तालुक्यातील कर्मचारी एकत्र जमून त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. तालुका प्रशासन , जिल्हा परिषदचे शिक्षक, महसूल, आरोग्य विभागातील व कृषी विभागातील कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाचा फटका सर्वच शासकीय कार्यालयांना बसला असून सर्व सामान्य नागरिक आपल्या कामानिमित्त शासकीय कार्यालयात येत आहेत परंतु कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे.

महाडः संपाला प्रतिसाद
जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या संपामध्ये महाड मधील शासकीय कर्मचारी देखील सामील झाल्यामुळे सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेज, सरकारी विभागाचे व्यवहार ठप्प झाले. सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेज, नगरपालिका, बहुतांशी सरकारी विभागाचे कामकाज ठप्प झाले आहेत.
याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील सरकारी आणि निमसरकारी यांनी आज महाड मधील चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून रॅली काढली तर जुनी पेन्शन लागू करा, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत बेमुदत संप पुकारला आहे. महाड तहसिलदार सुरेश काशिद यांना निवेदन दिले. तर त्यावेळी महाड तालुक्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरुडः तहसिलदारांना निवेदन
मुरुड तालुक्यात सरकारी कर्मचारी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले, विविध सरकारी कर्मचारी संघटनाच्यावतीने मंगळवारी घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार रोहन शिंदे यांना जुन्या पेंशन सहित विविध मागण्यांच निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कर्मचारी समन्वय समितीचे पदाधिकारी राजेंद्र नाईक, .रिमा कदम, शरद सुरवसे, या.का.पाटील, सुर्यकांत पाटील, सुशांत ठाकूर, चेतन मगर, राकेश पचिल, ओमकार कोरम्बार आर. जी. गायकवाड, प्रकाश आरेकर, जितेंद्र मकू हर्षा नांदगांवकर संतोष मारे रेश्मा कदम, यासह पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी मोठ्या संख्यने उपास्थित होते. शासनाने आमच्या मागण्यांचा विनाविलंब विचार करून त्या मार्गी लावाव्यात. असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवनी संघटना मुरुड तालुका अध्यक्ष राजेंद्र नाईक, रिमा कदम आणि पदाधिका-यांनी केले आहे. दरम्यान तहसील कार्यालय प्रांगणात सरकारी कर्मचारी बेमुदत संपात बसले आहेत. सुमारे तीनशे कर्मचारी यात संपात सहभागी झाले आहेत.

म्हसळा : कर्मचार्यांची निदर्शने
म्हसळा तालुक्यातील अनेक कर्मचारी संपावर गेले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन, अशा घोषणा देत कर्मचार्यांनी एसटी स्टँड ते तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या.जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
संपात महसूल कर्मचारी, शिक्षक, परिषद कर्मचारी, आरोग्य विभाग, नगर पंचायत कर्मचारी उतरल्याने या संपाचा फटका शाळा, शासकिय दवाखाने, शासकीय कार्यालयाना यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. म्हसळा नगर पंचायतीमधील शासन समावेश असलेले सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपाचा फटका शिधापत्रिकाधारकांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

उरणमधील शासकीय कार्यालये ठप्प
कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात मंगळवार (ता.14) रोजी शुकशुकाट बघावयास मिळाला. तहसील कार्यालय, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये दररोज असलेली गर्दी नसल्याने कार्यालये ओस पडलेली होती. पंचायत समिती कार्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. संपाच्या दिवशी बहुतांश कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट होता.
मात्र शासकीय कर्मचार्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जनतेच्या कामांचाय खोळंबा झाला आहे. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे दाखले हे संप मिटला तरच मिळतील अन्यथा त्यांना पुढील शिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज भरणे शक्य होणार नसल्याने वर्ष वाया जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून केली जात आहे. मंगळवारी उरण शहरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यामध्ये तहसिल, नगरपालिका, पंचायत समिती, शिक्षक वर्ग मधील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदी कामगारांचा पाठींबा
मुंबई, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व विविध मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. या संपास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्यावतीने बंदर व गोदी कामगारांचा पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारी,निम सरकारी व सार्वजनिक उद्योगधंद्यात 2004 नंतर भरती झालेल्या कामगारांना नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे, ही पेन्शन योजना कामगार कर्मचार्यांना अन्यायकारक आहे. एकाच उद्योगधंद्यात एकाच प्रकारचे काम करणार्या परंतु वेगवेगळे भरती झालेल्या कामगारांना दोन पेन्शन योजना लागू करणे हेच मुळात सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे 2004 नंतर भरती झालेल्या सर्व उद्योगातील कामगार कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अशी मागणी अध्यक्ष अॅड. एस. के.शेट्ये व जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी पोर्ट प्रशासनाकडे व सरकारकडे केली आहे.