। नागपूर । प्रतिनिधी ।
शपथविधी होऊनही अद्याप मंत्र्यांना खाती नाहीत. गेल्या पाच दिवसांपासून कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, शेतकरी इत्यादी विषयांवर विरोधक चर्चा करीत आहोत. मात्र, सरकारला त्याचे गांभीर्य नाही. हे सरकार असूनही नसल्यासारखे आहे, कारण राज्याची कायदा व सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरल्याचा घणाघात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत केला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांत घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवल्याचे टीकास्त्र दानवे यांनी डागले आहे. ते म्हणाले की, राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुन्हेगारीत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशचा असून दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची रेकी झाली. पुण्याच्या कारागृहात जेलर पठाण यांना मारण्याचा प्रयत्न झाला. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करून हत्या झाली. सत्ताधारी यांची ही स्थिती असल्यास सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.