| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. उरण तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी (दि.21) पुकारलेल्या बेमुदत संपात विविध खात्यांचे सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सरकारी-निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, समन्वय समिती रायगडचे चिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी बेमुदत संपाला संबोधित करताना सांगितले की, विविध कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारशी वारंवार चर्चा करूनही ठोस तोडगा न निघाल्याने सरकारी- निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचारी संघटना या आपल्या विविध मागण्यावर ठाम आहेत. तरी शासनाने जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, रिक्त पदांची भरती करावी, सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घ्यावे. तसेच, इतर प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
उरणमधील शासकीय कार्यालयात शुकशुकाट
