गेले कर्मचारी कुणीकडे..

साडेदहा वाजेपर्यंत सरकारी कार्यालये बंदच

| पेण | वार्ताहार |

सरकारी कार्यालये म्हणजे कधी वेळेत सुरु झाले असेल तर ते जनतेचे भाग्यच समजावे. त्याला पेणचे आरटीओ कार्यालय तरी कसे अपवाद असू शकते. बुधवारी कृषीवलच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत पेण शहरातील विविवध सरकारी कार्यालयांचे टाळे सकाळी साडेदहा वाजले तरी उघडलेले नव्हते असे दृष्टीस पडले. त्यामुळे गेले कर्मचारी कुणीकडे, असा सवाल सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

गेल्या 14 मार्चला राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपाची हाक दिली आणि सर्व कार्यालये ठप्प झाली. सरकारशी वाटाघाटी करून संप मागे घेतला खरा. परंतु, वेळेवर न येण्याची जी सवय लागलेली आहे ती सवय कर्मचार्‍यांची जाऊ शकत नाही हेच खरं. शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असताना नियमानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी 9:30 वाजता तर इतर कर्मचारी व अधिकार्‍यांनी 9:45 ला कार्यालयात हजर राहणे गरजेचे असते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण तहसिल, पेण पंचायत समिती, पेण नगरपालिका या महत्वाच्या कार्यालयांना 9:30 ते 10:30 च्या दरम्यात भेट दिली असता, उपप्रादेशिक कार्यालयाला तर टाळे असल्याचे आढळून आले. पेण तहसिलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर कर्मचार्‍यांचा वानवा होता. पेण नगरपालिकेत तुरळक कर्मचारी हजर होते.

पेण पंचायत समितीमध्ये देखील तिच स्थिती पहायला मिळाली. एकीकडे जुन्या पेन्शन मिळाव्या यासाठी ज्यावेळेला संपावर होते त्यावेळेला 9:30 वाजताच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हजर होत होते. मात्र, आता नियमीत कामकाज सुरू झाले असता हे कर्मचारी वेळेवर पोहोचताना दिसत नाहीत. शासनाने शनिवार, रविवारची सुट्टी देउनही आठवडयाचे पाच दिवस असताना मात्र, कामकाजाची वेळ ही जुन्याच पध्दतीने असल्याने अधिकारी वर्ग वागत आहेत. तसेच या सरकारी कार्यालयामध्ये बायोमॅट्रीक पध्दतीची हजेरी सुविधा नसल्याने याचा गैरफायदा घेउन मनमानेल तसे कार्यालयात येत आहेत.

अधिकार्‍यांची बनवाबनवी
ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी तथा अभियंते यांना दोन-दोन ठिकाणचा कार्यभार असल्याने ही मंडळी मोठया प्रमाणात सर्व सामान्यांची फसवणूक करताना दिसतात. कारण सर्व सामान्य नागरिकांनी विचारणा केल्यानंतर ते सांगत असतात की, मी या ठिकाणी आहे, मी त्या ठिकाणी आहे. असाच प्रकार पेण पंचायत समितीचे अभियंता देशमुख हे करत असल्याची तक्रार स्वप्निल म्हात्रे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. देशमुख यांच्याकडे पेण आणि कर्जतचा कनिष्ठ बांधकाम अभियंता म्हणून कार्यभार आहे. त्यांचा बुधवारी पेणचा वार असताना कर्जतला आहेत असे सांगितले तर कर्जत येथे चौकशी केल्यास ते पेणला आहेत असे समजले. यावरून अधिकारी वर्ग चालढकल करत आहेत हे सिध्द होत आहे. या अधिकार्‍यांविरुध्द गटविकास अधिकारी भाउसाहेब पोळ हे कारवाई करणार आहेत.

Exit mobile version