। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन डिसेंबर 2021 मध्ये तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखडा याप्रमाणे शासकीय ट्रँकरच्या माध्यमातून पाणी पोहचविण्यात यावे अशी मागणी टंचाईग्रस्त गावे आणि आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांनी केली होती. गेली अनेक दिवस मागणी केल्यानंतर 9 मे रोजी कर्जत तालुक्यात शासकीय ट्रँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी दोन गावे आणि चार आदिवासी वाड्या यांना देण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात यावर्षी मोग्रज, पिंगळस,धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट नीड यांचा तर तालुक्यात आनंदवाडी, भगताचीवाडी, काठेवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी,जांभूळवाडी,बांगरवाडी, पेटरवाडी, चाफेवाडी,वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, पाली धनगरवाडा, आसलवाडी, नाण्यांचा माळ, भूतीवलीवाडी, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, धामणदांड, बोरीचीवाडी-कळंब, काळेवाडी, मिरचुलवाडी, चिंचवाडी, अंथराटवाडी, बेलवाडी आषाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, भागूचीवाडी -1, भागूची वाडी-2, सावरगाव ठाकूरवाडी, हर्याचीवाडी, विकास वाडी, ठोंबरवाडी, गरुडपाडा, चिमटेवाडी, विठ्ठल वाडी, मेंगाळवाडी, तेलंगवाडी, कोतवालवाडी, कळकराई, बेकरेवाडी, माणगाव ठाकूरवाडी, स्टेशन ठाकूर वाडी, कोतवाल वाडी, नवसुचीवाडी, जांभूळवाडी-वारे, खाड्याचापाडा मधलीवाडी, चाहुचीवाडी, मिरचोल वाडी, नारळेवाडी, भोमळवाडी, दामत कातकरीवाडी आणि नांदगाव विठ्ठल वाडी यांचा समावेश ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात केला होता.
तालुक्यातील 56 आदिवासी वाड्या आणि 23 गावे या ठिकाणी भेडसावणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन शासनाने पाणीटंचाई निवारण्यासाठी शासकीय ट्रँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी देण्यासाठी आराखडा तयार केला आहे. पाण्याची स्थिती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी ट्रँकरच्या माध्यमातून मिळावे यासाठी मागणी केली होती. त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन ट्रँकर मंजूर केले आहेत. 12 हजार लिटर क्षमता असलेले ट्रँकर तालुक्यात आल्यानंतर 9 मे पासून शासकीय ट्रँकर सुरु केले आहेत. तालुक्यातील मोगऱज, पिंगलस या दोन गावांना तर ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी यांना ट्रँकर पोहचले आहेत. त्या त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये ट्रँकरमधील पाणी ओतलेले जाणार असून मोठ्या लोकवस्तीच्या मोगरज, पिंगळस या ठिकाणी दररोज तर अन्य तीन आदिवासी वाड्यांना दिवसाआड ट्रँकर पाणी पोहचवले जाणार आहे.तर आता यापुढे मागणी आलेल्या सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना ट्रँकरचे पाणी दिले जाईल अशी माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिली आहे.
ट्रँकरला जीपीआरएस?
सर्व ट्रँकर कोणत्या भागात फिरत आहेत याची माहिती मिळावी यासाठी शासनाने पाणी पोहोचविणारे ट्रँकर यांना जिपीआरएस यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यामुळे पाणी घेऊन गेलेला ट्रँकर कोणत्या भागात आहे याची माहिती मिळू शकणार आहे.
