स्वयंरोजगारासाठी शासनाचा मदतीचा हात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव | प्रतिनिधी |

वाढती बेरोजगारी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि आर्थिक अडचणींमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अनेक युवक-युवतींचे अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत शासनाने स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत विविध व्यवसायांसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, इच्छुकांनी 30 जुलैपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेत संगणक, झेरॉक्स मशीन, वेल्डिंग मशीन, पिको फॉल मशीन यांसारख्या व्यवसायाभिमुख साधनांचा समावेश असून, या उपकरणांच्या सहाय्याने युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला गती देण्यासोबतच लघुउद्योजक घडविण्याच्या दृष्टीने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. आवश्यक पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती संबंधित पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित युवक-युवती आजही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी ही योजना केवळ शासकीय मदत नसून स्वाभिमानाने उभे राहण्याची, स्वतःच्या कष्टावर संसार उभारण्याची आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याची नवी संधी आहे.

Exit mobile version