। मुंबई । वृत्तसंस्था ।
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा असतानाच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले. ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवले आहे. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून उत्तर दिले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला आहे. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन त्यांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बदलण्यात आली असून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली होती.
राज्य सरकारने अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल केला होता. पूर्वी गुप्त मतदानाने ही निवडणूक होत होती. मात्र, सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलला होता. आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याने तो घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांचे म्हणणे आहे.