सातव्या थरावरून गोविंदा कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल; जखमींवर महाडमध्ये उपचार सुरू
| महाड | प्रतिनिधी |
संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी (दि.5) दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शहरांसह ग्रामीण भागात विविध मंडळांकडून आकर्षक दहीहंड्या उभारण्यात आल्या असून, मोठमोठ्या बक्षिसांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, महाड शहरात आयोजित करण्यात आलेल्या पालकमंत्री दहीहंडी उत्सवादरम्यान चार गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री भरत गोगावले मित्र मंडळाच्यावतीने महाड शहरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी माणगाव, खेड, पोलादपूर, बिरवाडी, दापोली तसेच परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने गोविंदा पथके महाडमध्ये दाखल झाली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचण्यात येत होते. यावेळी उंच थर रचत असताना काही गोविंदा खाली कोसळल्याने चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सातव्या थरावरून गोविंदा कोसळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.
या दुर्घटनेत सुरज संभाजी भोसतेकर (माणगाव मित्र मंडळ), रुपेश सिताराम शिंदे (माणगाव मित्र मंडळ), अजय रमेश पिंगळे (सुशेरी एकविरा गोविंदा पथक, खेड) आणि सुमित वसंत सकपाळ (खेड मित्र मंडळ) हे गोविंदा जखमी झाले आहेत. या जखमी गोविंदांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी महाड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी माणगाव येथील एका गोविंदाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. दरम्यान, दहीहंडी उत्सवातील या दुर्घटनेमुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने गोविंदा पथके आणि नागरिक उपस्थित असलेल्या या उत्सवात सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
