पदवीधर मतदारसंघ निवडणूक! रायगड जिल्ह्यात ‘यांच्या’ नावाची चर्चा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गट या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्या नावाचा विचार केला जात आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांच्या नावावर विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोमाने नोंदणी सुरू आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण नेत्याला शिवसेना ठाकरे गट उतरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर याच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना सुद्धा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदवीधरची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याशिवाय कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू शिवसैनिक किशोर जैन यांच्या नावाची वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती आहे. कोकण आणि मुंबईच्या अहवालाची जबाबदारी ही किशोर जैन यांच्यावर होती. त्यामुळे जैन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येत आहेत.

Exit mobile version