| मुंबई | प्रतिनिधी |
आगामी काळात होणार्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात नजरेसमोर ठेवत सत्ताधारी शिंदे सरकारने दिवाळीचे औचित्य साधत राज्यातील तब्बल एक कोटी 62 लाख 42 हजार शिधापत्रिकाधारकांना अवघ्या शंभर रुपयात अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रेशनकार्ड धारकांना अल्पदरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याची योजना असून, त्यापोटी सरकारी तिजोरीवर सुमारे 500 कोटींचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर आल्याने कमी कालावधीत नागरिकांना या वस्तूंचा पुरवठा करावा, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रचलित निविदा प्रक्रियेला छेद देत, यावेळी थेट वायदे बाजारातून या वस्तूंची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.असे शिंदे यांनी सांगितले.
याशिवाय पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येणार आहेत तर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.