उद्या दहा ठिकाणी होणार मतमोजणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच व सदस्यपदाच्या एकूण 35 रिक्त जागांसाठी मंगळवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करत उत्साहाने मतदान केले. दुपारच्या कडक उन्हामुळे काही ठिकाणी मतदानाची गती मंदावली असली, तरी सायंकाळच्या सत्रात पुन्हा मतदारांनी केंद्राकडे धाव घेतली. जिल्ह्यातील 12 हजारांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 58.57 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये महिला मतदारांचे प्रमाण 58.2 टक्के, तर पुरुष मतदारांचे प्रमाण 58.95 टक्के होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 67.52 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मतमोजणी बुधवारी (दि.29) सकाळी दहा ते अकरा या वेळेत तालुका स्तरावर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायगड जिल्ह्यातील 126 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये सरपंचपदाच्या 30 रिक्त जागांपैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या, तर 11 जागांसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. परिणामी, केवळ पाच सरपंचपदांसाठी निवडणूक घेण्यात आली. सदस्यपदाच्या 167 जागांपैकी 55 जागा बिनविरोध निवडून आल्या, तर 82 जागांसाठी अर्जच दाखल झाले नाहीत. त्यामुळे 30 सदस्यपदांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले.
जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वैजाळी, नागाव, खंडाळे; मुरूडमधील एकदरा, काशीद, मांडला; कर्जतमधील पाली तर्फे कोतल खलाटी; खालापूरमधील होराळे; माणगावमधील वणीमलईकोंड; रोहामधील पूई; महाडमधील मोहोप्रे, ताम्हाणे, वराठी; पोलादपूरमधील महालगूर, तुर्भे बुद्रूक; म्हसळामधील घोणसे; श्रीवर्धनमधील दिवेआगर, बागमांडला या ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले.
सकाळी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला. दुपारच्या उन्हाचा तडाखा बसत असतानाही काही मतदारांनी केंद्रावर जाऊन मतदान केले, तर काही ठिकाणी दुपारी मतदानात खंड पडल्याचे चित्र दिसले. सायंकाळी चारनंतर पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी वाढली.
महाडमध्ये दुपारी मतदानाकडे पाठ
महाड तालुक्यातील मोहोप्रे, ताम्हाणे आणि वराठी या ग्रामपंचायतींमध्ये मतदान पार पडले. दुपारी दीड वाजेपर्यंत मोहोप्रेमध्ये 63.95 टक्के, तर वराठीमध्ये 36.13 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. दुपारच्या उन्हामुळे मतदार घराबाहेर पडले नाहीत. दुपारी दीड ते साडेतीन या दोन तासांत मतदानात फारशी वाढ झाली नाही. ताम्हाणे येथे मात्र काही प्रमाणात प्रतिसाद कायम राहिला.
अलिबागमध्ये 71 टक्के मतदान
अलिबाग तालुक्यातील नागाव, वैजाळी आणि खंडाळे या तीन ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 3,143 मतदारांपैकी 2,243 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच 71.36 टक्के मतदान झाले. वैजाळीमध्ये 72.12 टक्के, खंडाळेमध्ये 72.11 टक्के, तर नागावमध्ये 69.87 टक्के मतदानाची नोंद झाली. या ठिकाणची मतमोजणी बुधवारी सकाळी 11 वाजता अलिबाग तहसील कार्यालयात होणार आहे.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
जिल्ह्यातील 32 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्र परिसरात विनाकारण गर्दी होऊ दिली नाही. होमगार्ड जवानांचाही बंदोबस्तात सहभाग होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यात एकूण 67. 52 टक्के मतदान झाले. नऊ हजार 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात चार हजार 875 महिला व चार हजार 739 पुरुष मतदारांचा समावेश आहे.
महिलांनी 67. 85 टक्के आणि पुरुषांनी 67. 19 टक्के मतदान केले .
ग्रामपंचायत - टक्केवारी (सायंकाळी साडेपाचपर्यंत )
वैजाळी- 72.12
नागाव- 69.88
खंडाळे- 72.22
एकदरा-71.93
काशीद- 83.80
मांडला- 69.09
पाली तर्फे कोतल खलाटी- 64.65
होराळे- 81.48
वणीमलईकोंड- 46.60
पूई-58.06
मोहोप्रे- 69.41
ताम्हाणे- 48.32
वराठी- 38.69
महालगूर-70.84
तुर्भे बुद्रूक-57.96
घोणसेमध्ये 45.10
दिवेआगर- 68.86
बागमांडला- 65.29
