कर्जतमधील ग्रामपंचायत निवडणुकीला हाणामारीचा रंग

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायतीनंतर नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी दोन गटांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. मारहाण आणि दगड फेकून मारण्यापर्यंत घटना घडली असून, कर्जत पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी 10.30 वा. सुमारास छोटी चांदई, ता. कर्जत येथे दहा ते बारा जणांच्या जमावाने गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी आणि साथीदार हे फिर्यादीचे काका यांच्या घरासमोर थांबलेले असताना आरोपी तरुणाने शिविगाळी करुन त्यांना लोखंडी सळईने पाठीवर आणि उजव्या हातावर मारुन दुखापत केली. यबाबत फिर्यादी व त्यांचे साथीदारांनी त्या तरुणाला जाब विचारला असता त्याने फिर्यादीच्या डोक्यात व डावे तसेच उजव्या हाताच्या बोटावर लाकडी फळी आणि लोखंडी शिगेने फटके मारुन दुखापत केली. तर अन्य तीन तरुणांनी लोखंडी शिगांच्या सहाय्याने फिर्यादीच्या साथीदारांचे डोक्यावर आणि पाठीवर मारुन दुखापत केली तर एकाने हातात दगड घेऊन डोक्यात मारुन दुखापत केली. व इतर आरोपीत यांनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना शिवीगाळी व दमदाटी करुन, हाताबुक्क्यानी मारहाण केली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्यानोबा किरवले करीत आहेत.

दरम्यान, चांदई येथे दहा ते बारा जणांनी जमावबंदी आदेश माहीत असतानादेखील गैरकायद्ययाची मंडळी जमवून व सदर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन फिर्यादी तसेच साक्षीदार यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. त्यानंतर या जमावाने हाताबुक्क्यानी मारहाण करून तेथे असलेले फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या दिशेने दगड भिरकावून फेकून मारुन दुखापत केली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ग्यानोबा किरवले हे करीत आहेत.

Exit mobile version