ग्रामपंचायत निवडणूक! ऑनलाईन उमेदवारी अर्ज प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामपंचायत निवडणूकांची प्रक्रिया सुरू असून 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागवण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरण्यास उमेदवारांची दमछाक होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाचा सातत्याने सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना फार वेळ ताटकळत रहावे लागत आहे. आपला अर्ज केव्हा ऑनलाईन सबमिट होणार? याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता आणावी, अशी मागणी उमेदवारानी केली आहे.त्यासाठी नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी 28 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. मात्र सर्व्हर डाऊनचा फटका ग्रामपंचायत उमेदवारांना बसू लागला आहे.

दिवसभरात एका केंद्रावरून चार ते पाच फॉर्म सबमिट होत आहेत आणि उमेदवारांची संख्या मोठी असल्याने 2 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल कशी होणार? असा प्रश्‍न पडला आहे. तसेच कार्यालयात सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरताना फार कठीण परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

एक तर सर्व्हर डाऊन आणि दुसर्‍या बाजूने अर्ज स्विकारण्यासाठी दिवसातील केवळ चार तास. या गडबडीत उमेदवार हैराण होत आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने या ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या प्रणालीमध्ये सुसूत्रता आणली तरच निवडणुकीचे फॉर्म भरले जातील, अन्यथा अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी 2 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुभा दिली आहे.

विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

यू.पी. एस. मदान, राज्य निवडणूक आयुक्त
Exit mobile version