आता रंगणार ग्रामपंचायतींची रणधुमाळी

राज्यातील 471 सरपंच व 3120 सदस्यांची निवडणूक होणार
रायगडातील 127 ग्रा.पं.मधील 30 सरपंच व 170 सदस्यांसाठी निवडणूक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून, रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यभरात 471 सरपंच आणि 3 हजार 120 सदस्य पदांसाठी निवडणुका होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमधील 30 सरपंच आणि 170 सदस्य अशा एकूण 200 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार असून, 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुका कधी लागणार याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. राज्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट असून, काही ठिकाणी सरपंच व सदस्य पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. राजीनामे तसेच इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी या पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सांगली, वर्धा, वाशिम, गोंदिया आदी 34 जिल्ह्यांतील एकूण 2 हजार 444 ग्रामपंचायतींमधील 471 थेट सरपंच व 3 हजार 120 सदस्य अशा एकूण 3 हजार 591 रिक्त जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

30 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेचा प्रशासकीय टप्पा सुरू होणार आहे. तहसीलदारांकडून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 4 ते 13 एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, 17 एप्रिलला अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमध्ये 30 थेट सरपंच आणि 170 सदस्य पदांसाठी निवडणूक होत असून, एकूण 200 जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींवर दृष्टीक्षेप

जिल्हे ग्रामपंचायत थेट सरपंचसदस्य एकूण
रायगड12730170200
ठाणे7815101116
रत्नागिरी11414160174
सिंधुदूर्ग10515143155
पुणे15533226259
सातारा13834172206
कोल्हापूर1003989128
अहिल्यानगर64058590
नाशिक13312191203
Exit mobile version