आंबेडकर जयंतीदिनी ग्रामपंचायतीला कुलूप; ग्रामस्थ आक्रमक

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बेणसे ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. दरम्यान, अभिवादनासाठी गेलेल्या सिद्धार्थनगरमधील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याबाबत गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

सिद्धार्थनगर येथील अनुयायी, धम्म बांधव अभिवादन करण्यासाठी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गेले असता ग्रामपंचायतीला कुलूप असल्याचे दिसून आले. ग्रामसेवक सचिन घरत व कर्मचारी कुणीही त्याठिकाणी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थ व तरुणांनी या घटनेचा घोषणाबाजीने निषेध करून बंद दरवाजावरील कुलूपाला पुष्पहार अर्पण करून संताप व्यक्त केला. यासंदर्भात आपली भूमिका मांडताना सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत अडसुळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण राज्य देश आणि गाव खेड्यापाड्यात आणि शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. शासकीय कार्यालयात महामानवाची जयंती साजरी करण्याचे शासन आदेश असताना बेणसे ग्रामपंचायत कार्यालयाला सकाळी 10 वाजता कुलूप असल्याचे दिसून आले. वारंवार ग्रामसेवक व कर्मचारी यांना संपर्क करून आम्हाला महामानवाला अभिवादन करायचे आहे, असे सांगूनदेखील ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यास कुणी आले नाही. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बेणसे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नसल्याचा आरोप केला. याबाबत तमाम भीम अनुयायी धम्मबांधव यांच्यात याबाबत संतापाची भावना आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीअंती ग्रामसेवक आणि संबंधित व्यक्तींवर गटविकास अधिकारी पेण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप यांच्यामार्फत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत अडसुळे यांनी केली.

याप्रसंगी प्रत्येक्ष दर्शनी उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते बबन अडसुळे यांनी वरिष्ठ स्तरावर याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी बेणसे सिध्दार्थनगर गावचे ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रामसेवक हे अलिबाग येथे राहतात, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन अभिवादन अथवा जयंती साजरी केली असल्यास त्यासंबंधीचे फोटो अथवा सीसीटीव्ही फुटेज ग्रामस्थ आणि वरिष्ठांना दाखवावेत, अशी मागणी बेणसे सिध्दार्थनगर ग्रामस्थांनी केली.

बेणसे ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर इलेक्शन ड्युटी असल्याने पेण येथे गेलो. येथील कर्मचार्‍यास कार्यालयात थांबण्याची सूचना दिली होती.

सचिन घरत,
ग्रामसेवक, बेणसे
Exit mobile version