ठाकरे आणि वायकर जमीन प्रकरणाचे कोर्लई ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम जाणवू लागले आहेत. ग्रामपंचायत कोर्लईमध्ये जमीन प्रकरणाच्या गुन्हयाची होणारी चौकशी यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय काम करण्यास ग्रामसेवक देखील पदभार घेत नाहीत. याचा परिणाम ग्रामपंचायत परिसरात शासनाच्या योजना राबविण्यावर होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामपंचायत कोर्लई कार्यालयाला कुलूप लावून बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कोर्लई ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
कोर्लई येथे मागील अडीच वर्षापासून रश्मी उद्धव ठाकरे व मनीषा रविंद्र वायकर यांच्या मालकी जमिनीत ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या मिळकतीबाबत डॉ. किरीट सोमय्या यांच्यामार्फत या मिळकतींचा सतत पाठपुरावा करून माहितीच्या अधिकारात व प्रत्यक्षात ग्रामपंचायत कार्यालयात भेटी देऊन या संबधी माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयांकडून याबाबत कार्यवाही करण्याचे सतत पाठपुरावा केला आहे, तसेच या प्रकरणामुळे आयकर विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात तीन वेळा भेट देऊन माहिती घेण्यात आली, आयकर विभाग मुंबई यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या तपासणी कमी दस्तवेज घेऊन चौकशी सुरु केली आहे.
ग्रामपंचायत कोर्लईच्या विषयांबाबत वरिष्ठ कार्यालयांकडून गुन्हयाची नोंद सतत होत असल्याने तसेच पोलिसांमार्फत सतत चौकशीसाठी सामोरे जायला लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय हेतुपुरस्कर रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायत कोर्लईची वारंवार चौकशी व तपासणी होत आहे. या ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळण्यासाठी नवीन ग्रामसेवक कोणीही तयार होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांची कामे, विकासाची कामे व शासकीय योजना राबविणेकामी येथे कठीण झाले आहे, त्यानुषंगाने 31 जुलै 2023 रोजीच्या ग्रामपंचायत कमिटीच्या सभेत सतत होणाऱ्या चौकशी, गुन्हयाची नोंद, ग्रामसेवक उपस्थित न राहत असल्याने व कोणत्याही प्रकारच्या योजना राबविताना होणारा त्रास या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत कोर्लई कार्यालयाला कुलूप लावून बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे ग्रामपंचायत सरपंच राजश्री मिसाळ यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.