| रसायनी | प्रतिपिधी |
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई. 136 यांनी, ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर वाढता दबाव येत असल्याचा आरोप करत राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे आयोजन करू नये, असे निर्देश संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर ग्रामसभेदरम्यान दबाव वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी.एन.ई. 136 यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर ग्रामसभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित दबाव येऊ नये, तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे हाताळला जावा, या मागणीसाठी राज्यभर ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रालयातील संबंधित विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, सभापती तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. दरम्यान, खालापूर येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सभापती कृष्णा पारंगे आणि गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देऊन संघटनेच्या निर्णयाची माहिती दिली.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा ग्रामसभांवर बहिष्कार
