चार तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्या, नवनिर्मित तसेच मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, अशा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सात ग्रामपंचायतींची नव्याने आरक्षण सोडत करण्याचे आदेश जारी केल्याने गावपातळीवर आता निवडणुकांचा धुरळा उडेल. जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने 6 मार्च रोजी आरक्षणाची सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येणार आहे.
11 मार्च रोजी विशेष ग्रामसभा बोलवून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढणे (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधरण महिला) प्रभागनिहाय आरक्षण राशप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी 12 मार्च रोजी मान्यता देणे आवश्यक आहे. प्रभागनिहाय आरक्षणाचे राशप 12 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दि. 12 ते 19 मार्च या कालावधीत दाखल करता येणार आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी 21 मार्च रोजी प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे बंधणकारक आहे. तसेच 24 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याच दिवशी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे गरजचे आहे.
चार तालुक्यांतील सात ग्रामपंचायतींचा समावेश
जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई, पिंपळकोंड तर पेण तालुक्यातील निधवली, खालापूर तालुक्यातील उंबरे आणि दूरशेत तसेच पनवेल तालुक्यातील वहाळ अशा एकूण सात ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत संपत आहेत.
