। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या तयारीला जिल्हा प्रशासन लागले आहे. या निवडणूकांच्या अनुषंगाने आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम सोमवार दि. 13 जुन रोजी जाहिर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूकांच्या रिंगणात उभे राहण्याची इच्छा बाळगणार्या इच्छूक उमेदवारांची धडधड वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दि.04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नमूद केलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये सोमवार दिनांक 13 जुन 2022 रोजी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरूड जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणार्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक नगरपरिषदांमध्ये 13 जून रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून, आरक्षण सोडतीचे तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना संबंधीत नगरपरिषद कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना बुधवार, दि.15 जून 2022 ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे.