पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना; फेब्रुवारी 2027 मध्ये प्रत्यक्ष जनगणना
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात आगामी जनगणनेच्या हालचालींना वेग आला असून, संपूर्ण प्रक्रिया यावेळी पहिल्यांदाच मोबाईल ॲपच्या माध्यमातून पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रशासनाकडून आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून, जनगणनेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशाच्या इतिहासातील ही सोळावी, तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे. प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना केली जाणार आहे. हा टप्पा शुक्रवार 1 मे ते रविवार 14 जून या कालावधीत राबविला जाणार आहे. यादरम्यान प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन मोबाईल ॲपच्या सहाय्याने माहिती संकलित करतील. संकलित माहितीची पडताळणीही याच कालावधीत केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष जनगणना फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी “सेन्सस 2027-एचएलओफ” या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच स्व-गणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या स्वतःची माहिती नोंदवता येणार असून, या प्रक्रियेमुळे पारदर्शकता व अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. जनगणनेदरम्यान विचारली जाणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय आदी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून, ती केवळ सांख्यिकीय व विकास नियोजनासाठी वापरण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर समन्वय बैठका घेऊन विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी तसेच शहरातील सर्व घरांचा समावेश होईल यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्यापुरती मर्यादित नसून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक माहितीचा महत्त्वाचा स्रोत असल्याने तिच्या अचूकतेवर विशेष भर दिला जात आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारी ही जनगणना अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. जनगणना यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, 69 क्षेत्रीय प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षक तालुका व नगरपालिका स्तरावर नियुक्त 5,098 प्रगणक आणि 863 पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. याशिवाय 33 फील्ड ट्रेनर्सनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. माहिती संकलन करताना त्रुटी कमी ठेवून प्रक्रिया अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार आहे.
अशी असेल जनगणना प्रक्रिया
पहिला टप्पा : घरयादी व घरगणना
कालावधी : 1 मे ते 14 जून
पद्धत : मोबाईल ॲपद्वारे डिजिटल नोंद
दुसरा टप्पा : प्रत्यक्ष जनगणना
कालावधी : फेब्रुवारी 2027
विशेष : स्व-गणनेची सुविधा उपलब्ध
2011 च्या जनगणनेची आकडेवारी (रायगड)
एकूण कुटुंबे : 6,11,790
पुरुष : 13,44,345
महिला : 12,81,855
एकूण लोकसंख्या : 26,26,200






