| रायगड | वार्ताहर |
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी आपला कारभार हायटेक करत आधुनिक तंत्राचा वापर सुरू केला आहे; परंतु रायगड जिल्ह्यात अशीही काही गावे आहेत, तेथील नागरिक गणेशोत्सव किंवा होळीच्या सणाला गावाकडे येतात. इतर वेळेला घरात कोणीही राहत नसल्याने करवसुली करताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची करवसुलीसाठीची धावपळ सुरू झाली आहे.
मागील थकबाकीसह 243 कोटी तीन लाख रुपये घरपट्टीच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित आहे. जानेवारी संपेपर्यंत यातील 65 टक्के घरपट्टी वसूल झाली होती, तर पाणीपट्टीपोटी जिल्हा परिषद नागरिकांकडून मागील थकबाकीसह 25 कोटी 66 रुपये वसूल करणार आहे. परंतु यातही ग्रामपंचायतीला समाधानकारक प्रगती करता आलेली नाही. दिलेले उद्दीष्ट्ये साध्य करणे आवश्यक असल्याने पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आता घराघरांत हेलपाटे मारत आहेत. सर्वात कमी वसुली पेण आणि तळा तालुक्यात आहे. तर सर्वात जास्त करवसुली कर्जत आणि रोहा तालुक्यात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सण-उत्सवासाठी चाकरमानी गावाकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे पैसे असतात. अशा वेळी घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी दाराशी आल्यावर, चाकरमानी कोणतीही आडकाठी न करता कराची रक्कम भरतात. मात्र, इतर वेळेला घरांना कुलूप असल्याने कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात.
महाड, पोलादपूर, श्रीवर्धन या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी करवसुलीसाठी प्रभावी युक्ती राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यास करदात्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. करवसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ऑनलाईन पद्धतीने कर वसुलीचा निर्णय घेतला. यासाठी आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या ग्रामपंचायतींनी मोबाईल ॲपही आणले आहेत. मोबाईलच्या एका क्लिकवर बिले भरता येणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरू झाला आहे; तरीही आर्थिक वर्षाअखेर कर्मचाऱ्यांना करावी लागलेली धावपळ अद्याप संपलेली नाही.
अमृत ग्राम डिजिटलद्वारे 73 टक्के करवसुली जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 809 ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वसुली करावी लागते. यासाठी थकबाकीदारांना वेळोवेळी बिले भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यात ग्रामपंचायतींमध्ये अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली कार्यान्वित केली आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून क्यूआर कोडद्वारे घरपट्टी, पाणी पट्टी भरता येत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा ग्रामपंचायत विभागाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात कर वसुलीमध्ये भर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
कर वसुलीवरील दृष्टीक्षेप मागील थकीत घरपट्टी - 37 कोटी 13 लाख चालू वर्षाची घरपट्टी - 205 कोटी 89 लाख घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट्ये - 243 कोटी 3 लाख वसुल घरपट्टीची टक्केवारी - 65 टक्के मागील थकीत पाणीपट्टी - 4 कोटी 95 लाख चालू वर्षाची पाणीपट्टी - 20 कोटी 71 लाख पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्ट्ये - 25 कोटी 66 लाख वसुल घरपट्टीची टक्केवारी - 64 टक्के
थकीत कर वसुली करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत काही उपाययोजना करीत असते. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून कर वसुलीकडे विशेष भर दिला जात आहे. करवसुली वेळेत आणि आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींद्वारे घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याचे आवाहन करण्यात येते. यासाठी ग्रामपंचायतींना क्यूआर कोड दिला आहे. पारंपरिक कर वसुलीची बंद करून आधुनिक पद्धतीने पाणी, घरपट्टी भरण्याची सवय नागरिकांना लागावी, कामात पारदर्शकता असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राजेंद्र भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग