रामदासपठार येथे समर्थांच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा

| पोलादपूर | वार्ताहर |

श्रीराममंदिराच्या लोकार्पणावेळी समर्थ रामदासस्वामी यांच्या नावाने अयोध्येमध्ये विद्यापिठाच्या निर्मितीचा विषय आला आणि समर्थ रामदासस्वामी रचित भविष्यपुराण असलेल्या ‘आनंदवनभुवनी’ महाकाव्यातील ‘विद्यापिठ ते आहे।आनंदवनभुवनी॥’ या पंक्तींचे स्मरण झाले. समर्थांनी विद्यापिठाचे भविष्य त्याकाळामध्ये बघितले असल्याचा उल्लेख या पंक्तींमध्ये आढळून येतो. ‘आनंदवनभुवनी’ महाकाव्यातील अनेक दृष्टांतांचे साक्षात्कार आणि उलगडा होण्यासाठी संशोधनाचे कार्य यापुढेही अव्याहत सुरू राहिले पाहिजे, असे मत सर्वग्रंथ आरंभांचे स्थान असलेल्या रामदासपठार येथील आनंदवनभुवनी म्हणजेच शिवथर घळीचे आणि सुंदरमठाचे संशोधक व अभ्यासक शैलेश पालकर यांनी मार्गदर्शनप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेविका राखी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील उद्योजक किसन भोसले, चार्टर्ड अकाऊंटंट सदगीरे, पुणे येथील बांधकाम व्यावसायिक सुनील मोरे, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र उतेकर, श्रीगणेशनाथ महाराज मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास घोरपडे, श्रीगणेशनाथ महाराज विद्यालयाच्या सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा मॅडम, स्थानिक प्रमुख दत्ताराम आमकर, सखाराम डिगे, संजय नलावडे, सुभाष नलावडे, बळीराम डिगे, शेलारमामांचे 12वे वंशज वसंतराव शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी स्थानिक प्रमुख दत्ताराम आमकर यांनी प्रास्ताविकामध्ये, समर्थ रामदासस्वामींच्या 343 व्या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ 27 फेबु्रवारीपासून सदगुरू अरविंदनाथ महाराज यांच्याहस्ते ब्रह्मध्वज पूजनाने झाला असून सदगुरू श्रीअरविंदनाथ महाराज आणि पत्रकार पालकर यांनी स्वयंभू शिवथरची घळ म्हणून लोकांसमोर संशोधनातून सादर केली असून या घळाची प्रसिध्द आता जगभर झाली असल्याचे आवर्जून सांगितले.

यावेळी पुणे येथील उद्योजक किसन भोसले यांनी, जरी पोलादपूर तालुका रहिवासी संघ नावाने पुणे येथे आम्ही संस्था चालवित असलो तरी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्गसह रायगड जिल्ह्यातील सुमारे 7 लाख लोकसंख्या पुणे परिसरामध्ये वास्तव्यास असून त्या सर्वांचे प्रश्‍न आम्ही सोडवित असतो, असे सांगून समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी येण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतार्थतेची भावना निर्माण झाल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेविका राखी जाधव यांनी, माझेरी परिसरामधील माहेर असल्याने या परिसरातील अशा आध्यात्मिक कार्यक्रमांना निमंत्रित करण्यात आल्यास आवर्जून यावेसे वाटते असे सांगून श्रीगणेशनाथ महाराज विद्यालयाच्या सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळांसोबतच आध्यात्मिक संतभुमीमध्ये उपक्रम राबविताना विविध क्षेत्रातील मंडळींना निमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त केला. सदगुरू श्रीअरविंदनाथ महाराज यांच्या मुंबई घाटकोपर परिसरातील विविध उपक्रमांमध्ये आम्ही अनुयायी म्हणून दिलेल्या आदेशानुसार सक्रीय असतो, अशी कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर डॉ.नंदकुमार मराठे यांचे किर्तन झाले.

Exit mobile version