ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव

कर्जत | वार्ताहर |
कर्जतमधील ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना बेटी फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बेटी फाऊंडेशन महाराष्ट्र या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या संस्थेच्यावतीने आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार 2021 देऊन मंगला बारकू केदारे-जगताप यांना सन्मानित करण्यात आले आहे. बेटी फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या संस्थेद्वारा देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.
बेटी फाऊंडेशन या संस्थेने देश विदेशातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, कला तसेच उत्कृष्ट शासकीय सेवा अशा विविध क्षेत्रात कार्य करणार्‍याना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. बेटी फाऊंडेशन द्वारा 2021 मध्ये 11 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार महोत्सव घेण्यात आला.
मंगला केदारे-जगताप ह्या सण 2005 पासून रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक पदावर नोकरी करत असून, 16 वर्षे सेवाकाळात समाजोपयोगी योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे भरीव कार्य करत आहेत. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे नोकरीच्या निमित्ताने समाजसेवा करण्याची नामी संधी चालून आल्यामुळे संधीचे सोने करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. विविध ग्रामपंचायतींमध्ये उत्कृष्ट काम करून आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखविली आहे.
कोविड 19 च्या जागतिक महामारीच्या काळात त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 च्या प्रसारावर अंकुश आणला. गोरगरीबांची उपासमार होणार नाही यासाठी शासन आदेशाचे काटेकोर पालन करून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांना विश्‍वासात घेऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळोवेळी केला. भिवपुरी टाटा कॅम्प व शिरसे ग्रामपंचायतीत पर्यटन विकास केंद्र स्थापित करून शासन दरबारातून अनुदान प्राप्त करण्यासाठी सातत्याने धडपड करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत बेटी फाऊंडेशन या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्याती असणार्‍या संस्थेने दखल घेऊन आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.तसेच पर्यटनाची अत्यंत जवळची बांधिलकी समजून कर्जत तालुक्यात पर्यटनाला चालना मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समिती ने राज्य स्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Exit mobile version