तरुणाईला रोजगाराची सुवर्णसंधी; शेकडो तरुणांना मिळाले कॉल लेटर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुधागड तालुका मराठा समाज आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल यांच्या संयुक्त विद्यमाने पाली येथे एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले. पाली येथील मराठा समाज भवनमधील स्व. सटूराम सखाराम साजेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला सुधागड तालुक्यासह पाली शहरातील शेकडो सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, अनेक उमेदवारांची जागेवरच मुलाखत घेऊन त्यांना तात्काळ नोकरीचे कॉल लेटर सुपूर्द करण्यात आले.
हा मेळावा सुधागड मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुधागड तालुक्यातील तरुण-तरुणींना त्यांच्या हक्काच्या रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील हजारो पदांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील अनेक गरजू व हुशार तरुणांनी या संधीचे सोने करत आपले भविष्य सुरक्षित केले. ग्रामीण भागातच, घराच्या जवळ नामांकित कंपन्यांच्या मुलाखती देण्याची संधी मिळणे आणि थेट हातात नोकरीचे कॉल लेटर मिळणे हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी अत्यंत सुखावह क्षण होता. त्यामुळे उपस्थित तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग व रोजगार समिती प्रमुख अमित दंत यांनी केले. केतन म्हस्के यांनी अत्यंत प्रभावीपणे सूत्रसंचालन केले, तर कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, संचालक तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
यावेळी उमेदवारांचे योग्य समुपदेशन करून त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी यशस्वी अकॅडमी फॉर स्किलचे तज्ज्ञ अधिकारी मीडिया मॅनेजर (पुणे) योगेश रांगणेकर व सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी रोजगार मेळाव्यात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. असोसिएट मीडिया विभागाचे ज्ञानेश्वर गोफण, टीम लीडर आशिष कुमार, भरती विभाग, मोबिलायझेशन एक्झिक्युटिव्ह प्रमोद गांजहंस, मोबिलायझेशन ऑफिसर सत्यम आवारी व अक्षय जाधव, फिल्ड सुपरवायझर बाळकृष्ण म्हात्रे व सुपरवायझर राहुल परदेशी या सर्व तज्ज्ञ चमूने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मुलाखतींचे आयोजन करून योग्य उमेदवारांची निवड केली.
