I पाली I | वार्ताहर |
जालना जिल्ह्यातील घटनेमुळे सुधागड तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि.4) मराठा समाजाच्या वतीने पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव उपोषणास बसले होते. ते शांततेत उपोषण करत असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेराव घालून त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
या घटनेच्या निषेधार्थ सुधागड तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून, या घटनेचा जाहीर निषेध करत मराठा समाज भवन ते तहसील कार्यालया पर्यंत सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर याच्या नेतृत्वखाली समाजाच्या वतीने घोषणाबाजी करत पाली शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार उत्तम कुंभार यांना या घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. या निषेध मोर्चामध्ये शेकडो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. या निषेध मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.
या हल्ल्याचा निषेध करत ज्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यांचासुद्धा निषेध केला. तसेच यापुढे अशीच भूमिका शासनाची असेल तर पुढील आंदोलने गनिमीकाव्याने होतील, असे निवेदनातून स्पष्ट केले. ही घटना म्हणजे काळिमा फासणारी असून ज्यांनी कोणी हे आदेश दिले आहेत, त्यांचा सर्वप्रथम राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर , कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर, सरचिटणीस जीवन सजेकर, माजी अध्यक्ष गणपत सितापराव, भास्कर पार्टे, योगेश मोरे, चंद्रकांत घायले, बालाजी सावंत, समृध्दी यादव, कुमुद भोईर, दळवी, खैरे आदिसह सर्व विभागीय अध्यक्ष, संचालक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मराठा समाज बंधु भगीनी उपस्थित होत्या.