मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यांची चर्चा
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात विराट हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनात राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी हिंदू समाजाने संघटित होण्याची गरज व्यक्त करत नेरळ परिसरातील अतिक्रमण, धर्मांतर, लव्ह जिहाद आणि अनधिकृत बांधकामांबाबत भूमिका मांडली.
संमेलनात बोलताना नितेश राणे यांनी नेरळ परिसरात वाढणाऱ्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच अनधिकृत मशिदींवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस प्रशासनालाही इशारा दिला. त्यांच्या भाषणातील काही वक्तव्यांमुळे सभास्थळी मोठी चर्चा रंगली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण सहकार्यवाह ॲड. अविनाश मोरे, आयुर्वेद अभ्यासक डॉ. वर्षा जोशी, समितीचे अध्यक्ष कुमार जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत मंगेश म्हसकर, नरेश मसणे, नरेश कराळे आणि सचिव ॲड. अमोल सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. अमोल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात नेरळ परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले. तर, ॲड. अविनाश मोरे यांनी हिंदूंनी राष्ट्र प्रथम या भावनेतून एकत्र येण्याचे आवाहन केले. डॉ. वर्षा जोशी यांनी पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य आणि एकत्र कुटुंब पद्धती यावर मार्गदर्शन केले. दरम्यान, संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नेरळ परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभास्थळ बाजारपेठेत असल्याने परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच इमारतींवर पोलीस तैनात करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्जतपर्यंत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
