। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
सेवानिवृत्तीनंतर सायकलच्या प्रेमात पडलेल्या 72 वर्षांच्या आजोबांनी मजल दरमजल करत त्यांनी सहाशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून कोकणात प्रवेश केला आहे. युवकांनी व्यायामाकडवळले पाहिजे, सायकलिंग हा सर्वांत उपयुक्त व्यायाम आहे, असा संदेश देत हे सायकलपटू कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मुकुंद कडूसकर आणि जयंत रिसबूड अशी या दोघा सायकलपटूंची नावे आहेत.
कोकणचे अद्वितीय निसर्गसौंदर्य निरखित कोकणच्या माणसांची भेट घेत त्यांचा प्रवास सुरू आहे. येथे संवाद साधताना आनंद होत असल्याचे दोघांनी सांगितले. ते म्हणाले, “सकाळी 7 वाजता चहा, नाश्ता घेऊनच प्रवासाला सुरुवात करतो. दुपारी हलका आहार घेतो. दिवसभरात सुमारे 70 ते 80 किमीचे अंतर पार करतो. काळोख पडला की तिथे वास्तव्य व पुरेसे जेवण घेतो. भक्तनिवासात व अन्य ठिकाणी उपलब्ध खोलीत वास्तव्य केले. सायकलचे स्पेअर पार्टस्, हवा भरण्यासाठी पंप सोबत आहे.
कडूसकर यांनी कॉलेजमध्ये असताना सायकलवरून दोन हजार किमीचा पल्ला गाठला होता. नंतर 25 वर्षे अबुधाबी, नायजेरिया या देशांमध्ये प्रिंटिंग व्यवसाय केला तेथे सायकलिंग क्लबमध्ये सहभाग घेतला. नियमित 20 ते 50 किमीचे अंतर ते पार करत होते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सायकलिंग सुरू केले. परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारिता, मुद्रण प्रकाशमध्ये संपादक म्हणून सेवा बजावली.
विविध वृत्तपत्रांतही ते लेखन करत होते.जयंत रिसबुड हे किर्लोस्कर कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. ते पूर्वी कंपनीत सायकलनेच जात होते. नंतर ही सवय मोडली. परंतु 30 वर्षे ट्रेकिंग करत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील 91 किल्ले, हिमालयात 6 वेळा ट्रेकिंग केले आहे. निसर्गात जायचे व त्यामुळेच तब्बेत चांगली राहते, हा संदेश सायकल सफरीतून देत असल्याचे त्यांनी सांगितले.





