खेळाडू असलेल्या हॉटेलला आग
| चेन्नई | वृत्तसंस्था |
भारतामध्ये ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा पार पडणार आहे. चेन्नई येथे या स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार होती; मात्र, खेळाडू वास्तव्यास असलेल्या हयात रेजेंसी या हॉटेलमध्ये आग लागल्यामुळे ही स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली. या स्पर्धेला गुरुवारपासून सुरूवात झाली आहे.
चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे संचालक श्रीनाथ नारायणन यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती देताना सांगितले, की हयात रेजेंसी या हॉटेलला काल मंगळवारी (दि.5) रात्री आग लागली. ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा येथेच होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना नजीकच्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. चेस बेस इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील हयात रेजेंसी हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागली. नवव्या मजल्यावर ही घटना घडली. संपूर्ण हॉटेलमध्ये धूर पसरला. श्वास घेण्यास त्रास होण्याआधी हॉटेल रिकामे करण्यात आले.
चेन्नई येथे होत असलेल्या ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या संयोजकांकडून वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, अनपेक्षितपणे लागलेल्या आगीमुळे स्पर्धा एक दिवस पुढे ढकलण्यात आली; मात्र, स्पर्धेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही. ही स्पर्धा 15 ऑगस्टलाच पूर्ण होणार आहे. वेळापत्रकात फक्त एक बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेदरम्यान एक दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. आगीमुळे एक दिवस वाया गेला. त्यामुळे आता विश्रांतीचा दिवस काढून टाकण्यात आलेला आहे.
