| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील पशुधनाला चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी वनविभागाच्या पडीक जमिनींवर उपलब्ध असलेले गवत कापून ते दुष्काळी भागात पाठविण्याची व्यवस्था केंद्र व राज्य सरकारने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे जंगलातील गवत वाळून जाते.त्यानंतर अनेक ठिकाणी वणवे लागून मोठ्या प्रमाणावर जंगल आणि गवत जळून खाक होते. त्यामुळे हे गवत आगीत नष्ट होण्यापूर्वीच त्याची कापणी करून साठवणूक केल्यास दुष्काळी तालुक्यांतील चारा छावण्यांसाठी त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील बहुतांश भागात शेतीची कामे कमी झाल्याने पडीक जमिनींचे प्रमाण वाढले आहे. जमिनींवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गवत उगवले असून, त्याचा योग्य वापर करण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे म्हसळा तालुक्यात सुमारे 3600 एकर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. खाडीकिनारपट्टीचा भाग वगळता वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गवत उपलब्ध आहे. एकीकडे दुष्काळी भागातील पशुपालकांना जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असताना दुसरीकडे कोकणातील वनक्षेत्र आणि पडीक जमिनींवरील गवत कोणत्याही उपयोगाविना नष्ट होत आहे. या दोन्ही परिस्थितींचा विचार करून शासनाने नियोजनबद्ध पद्धतीने गवत कापणी, संकलन, साठवणूक आणि वाहतुकीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी या विषयात पुढाकार घेऊन केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा. तसेच, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






