जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. या रस्त्यावरून जाणारी वाहतूक अनेक दिवसापासून बंद केल्यामुळे ही वाहतूक आंबेवाडी बाजारपेठेपासून विजय वाईन शॉपपर्यंत बायपास रस्त्यानी वळविण्यात आली आहे. या रस्ता ठेकेदाराच्या मनमानीनुसार बनविण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याला वापरण्यात आलेली खडी रस्त्यावर पसरलेली आहे. यामुळे ही खडी या रस्त्यावरून वाहन गेल्यावर आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. यामुळे प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सोमवार (दि.17) नोव्हेंबर रोजी टुव्हीलर स्वार या मार्गांवरून प्रवास करीत असतांना बसच्या चाकाखालून एक दगड उडून टुव्हीलरस्वार याच्या डोक्याला लागला. सुदैवाने त्याच्या डोक्याला हेल्मेट असल्यामुळे तो थोडक्यात बचावला.
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील चौपदरी करणाच्या रस्त्याचे काम गेली 18 वर्षांपासून सुरु असुन अद्याप ही काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या महामार्गांवरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम पावसाळा संपल्यानंतर गेली आठ दिवसापासून सुरु करण्यात आला. परंतु हे काम सुरु करण्याच्या अगोदर दोन्ही बाजूच्या बायपास रस्त्याचे काम खड्डे भरून करायला पाहिजे होते. परंतु असे करता संबंधित ठेकेदारांनी या बायपास रस्त्याचे थातुरमातुर काम करून या रस्त्याने वाहतूक वळविण्यात आले आहे. पण या रस्त्याचे काम करतांना वापरण्यात आलेली खडी रस्त्यावरच पसरलेली असुन ही खडी प्रवाशी वर्गाच्या अंगावर उडत आहे, यामुळे एखादा प्रवाशी नाहक जखमी झाला तर याला जबाबदार कोण अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठे हे मध्यस्ती ठिकाण असुन येथे मुंबई गोवा, पुणे, अलिबाग या चार ही ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करायचा असल्यास प्रवाशी वर्गाला आंबेवाडी नाक्यावर यावे लागते. तसेच या मार्गांवर असणारे शाळा, कॉलेज यामुळे विद्यार्थ्यां संख्या ही मोठ्या प्रमाणात येजा करीत असतात. परंतु अशा निस्कृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे प्रवाशी वर्गाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
आंबेवाडी बाजारपेठेतील बायपास रस्त्याचे काम अतिशय निस्कृष्ठ दर्जाचे केले आहे. या रस्त्याला वापरण्यात आलेली खडी रस्त्यावर पसरलेली आहे. या महामार्गाने एखादा मोठा वाहन गेला तर ही पसरलेली खडी प्रवाशी वर्गाच्या अंगावर उडत आहे. याची वारंवार कल्पना संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे, तरी ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे यामुळे कोण गंभीर जखमी झाला किंवा कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार असेल.
-चंद्रकांत लोखंडे







